जिल्हा परिषद : कामावर हजर झाल्यानंतर अकलाडे यांना समन्स बजाविणार
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची कुठलीही परवानगी न घेता परस्पर वर्ग खोल्या बांधण्याचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केल्याने या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी बुधवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी सीईओ बी. एन. पाटील यांची भेट घेऊन, या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी सीईओंनी सध्या रजेवर असलेले प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे कामावर हजर झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावणार असल्याचे आश्वासन अध्यक्षांना दिले.
जिल्हा नियोजन विभागातर्फे मिळणाऱ्या निधीतून शाळांमध्ये वर्ग खोल्या बांधण्याबाबत शिक्षणाधिकारी अकलाडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशी कुठलीही चर्चा न करता परस्पर शाळांची यादी तयार केली. यामध्ये एकूण ५९ शाळांमधील १०२ वर्ग खोल्यांचा समावेश आहे, तसेच यासाठी एकूण ९ कोटींचा निधी लागणार आहे. अकलाडे यांनी शाळांची ही यादी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांची कुठलीही लेखी परवानगी अथवा तोंडी परवानगी न घेता परस्पर हा प्रस्ताव तयार केल्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य नाना भाऊ महाजन यांनी याप्रकरणी रंजना पाटील यांच्याकडे तक्रार करून शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती, तसेच या प्रकाराबाबत रंजना पाटील यांनीदेखील शिक्षणाधिकाऱ्यांनी आपलीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले होते, तसेच याबाबत स्वतः जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे तक्रार करण्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी रंजना पाटील यांनी सीईओंची भेट घेऊन प्रशासनाकडून परस्पर प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.
इन्फो :
सीईओंनी दिले नोटीस बजावण्याचे आश्वासन
जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांची तक्रार केल्यानंतर सीईओ बी. के. पाटील यांनी नियमानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी अध्यक्षांची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षांची परवानगी घेतल्यानंतरच प्रस्ताव तयार करायला हवा होता. मात्र, यापुढे असे प्रकार जिल्हा परिषदेत घडणार नाहीत, याबाबत आपण आदेश काढणार असल्याचे अध्यक्षांना सांगितले, तसेच तब्येत बरी नसल्यामुळे रजेवर असलेले भाऊसाहेब अकलाडे यांना पुन्हा असा प्रकार न करण्याबाबत समन्स बजावणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अकलाडे यांनी तयार केलेला प्रस्ताव स्थगित करण्यात आला असल्याची माहिती रंजना पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.