खर्च वाढल्याने बळीराजा मित्रापासून दुरावला : तांत्रिक अवजारांवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शेतकऱ्याचा खरा आणि सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणारा सर्जाराजा आता बळीराजापासून दूर जात आहे. निसर्गाच्या चक्रामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, बैलांचा वाढत जाणारा खर्च व सोन्याच्या भावाप्रमाणे बाजारात मिळणारा भाव यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी बैलजोडी घेण्यापेक्षा तांत्रिक अवजार व साहित्याला प्राधान्य देत आहेत.
जिल्ह्यात वरखेडी, चोपडा, नेरी, सावदा याठिकाणी बैलांचा मोठा बाजार भरत असतो. या प्रत्येक बाजारात आता बैलजोड्यांची मागणी काही प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे. बैलजोड्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सद्यस्थितीत ७० हजारापासून बैलांचे भाव सुरू होतात. तर खिल्लार, मालवी व नागोर जातीच्या बैलजोड्यांचे भाव ३ लाखांपर्यंत जातात. काही मोठे शेतकरी हे बैल खरेदी करतात; मात्र लहान शेतकरी कमी दराचे बैलजोड्या खरेदी करतात मात्र दर वाढतच असल्याने आता लहान शेतकरीही बैलजोडी खरेदी करण्यात असमर्थ ठरत आहेत. कोणत्याही शेतकऱ्यासाठी बैलजोडी ही वैभवाचे प्रतीक मानले जात होते; मात्र वाढत जाणाऱ्या भावामुळे बैलजोडी आता परवडत नाही.
कोट्यवधीची उलाढाल
जिल्ह्यात बैलजोडींची मागणी घटली असली तरी बैलांचे भाव वाढल्याने बाजारातील उलाढाल कमी झालेली नाही. चोपडा, वरखेडी, नेरी, सावदा या ठिकाणी बैलजोड्यांचा मोठा बाजार भरत असतो, एका बाजारात दिवसाला कोट्यवधींची उलाढाल होत असते. विशेष म्हणजे काही महिन्यांपासून गुजरात, राजस्थान या भागातून येणारे व्यापारी कमी झाले आहेत. तरी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोनाच्या काळात हे बाजार बंदच होते. आता रब्बी हंगाम सुरू असून, उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीसाठी बैलजोड्यांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता हरीश सुर्वे या व्यापाऱ्याने व्यक्त केली.
दुधाळ जनावरांची मागणी घटली
१.बैलांसह म्हशी व गायीचे दरदेखील वाढले आहेत. यामुळे दुधाळ जनावरांची मागणी घटली आहे.
२. म्हशीचे दर १ लाखापासून सुरुवात होतात, तसेच म्हशीवर दिवसाला मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
३.म्हशीवर होणारा खर्च मात्र त्यापासून मिळणाऱ्या दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरं पाळणे कमी केले आहे.
४. दुधाळ जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचेही दर वाढले आहेत. त्यातच या जनावरांची देखभालदेखील नियमित ठेवावी लागते.
बैलजोडीचा दिवसाला ४०० रुपये खर्च
बैलजोडी घेतली तर बैलांना नियमित चारा द्यावा लागतो. त्यातच ढेप खावी घालावी लागते. ढेपचा दर आता २४०० रुपये एक पोते एवढा झाला आहे. ढेप १० ते १२ दिवस पुरते, तसेच बैलांची देखभाल ठेवण्यासाठी सालदार ठेवावा लागतो, एका वर्षाला सालदाराला ६० ते ७० हजार रुपये द्यावे लागतात.
जनावरे सांभाळणे झाले कठीण
बैलांचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच बैलांवर होणारा खर्चदेखील वाढतो. शेतकऱ्यांचा जर दरवर्षी हंगाम चांगला झाला तर शेतकरी बैलजोड्यांवर खर्च करेल; मात्र हंगाम न झाल्यास शेतकऱ्यांना बैलजोड्यांवरचा खर्च आता परवडत नाही.
-नामदेव पाटील, शेतकरी.
बैल असो वा म्हशी, सर्वच जनावरांचे दर वाढले आहेत. वाढणाऱ्या महागाईच्या काळात बैल सांभाळणे कठीण झाले आहे. आधी शेतकऱ्यांकडे चाऱ्याची मुबलकता असायची; मात्र आता उन्हाळ्यातच चाऱ्याची कमतरता भासते, अशा परिस्थितीत बैलांना सांभाळणे शक्य होत नाही.
-विलास पाटील, शेतकरी
चाऱ्याचे दर वाढले आहेत, यासह ढेपदेखील महागली आहे. बैलजोड्या खरेदी करण्याचीही स्थिती शेतकऱ्यांची नाही, कारण बैलजोड्या महागल्या आहेत. दर ३ लाखांपर्यंत गेले आहेत. अशा परिस्थितीत बैलजोडी खरेदी करणेच शक्य होत नाही.
-कपील चौधरी, शेतकरी.