जळगाव : दोन दिवसांपूर्वी दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात बुधवार, २३ डिसेंबर रोजी थेट तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ७०० रुपयांवर आले.कोरोना लस, इंग्लंडमधील नवीन संसर्ग तसेच सट्टा बाजारातील खरेदी-विक्री यामुळे सुवर्ण बाजार अस्थिर होत आहे. यात सोमवार, २१ डिसेंबर रोजी चांदीच्या भावात वाढ होऊन ती ७१ हजारावर पोहचली होती. त्यानंतर मंगळवारी त्यात ५०० रुपयांनी घसरण झाली व ती ७० हजार ५०० रुपयांवर आली होती. बुधवारी तर यात पुन्हा तीन हजार रुपये अशी मोठी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर आली. अशाच प्रकारे २१ डिसेंबर रोजी सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. बुधवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांनी घसरण झाली व ते ५० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले.