लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील ९.५० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील १९ हजार कोटीहून अधिक रक्कम बँक खात्यात हस्तांतरण करण्यात आली आहे.
हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी-२०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये १.१५ लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून १३ मे, २०२ अखेर १०५.३० लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण ११ हजार ६९४ कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच १४ मे रोजीच्या कार्यक्रमात १ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण ९५.९१ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये १ हजार ९१८ कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.