भुसावळ,दि.5-मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप असलेले भुसावळ नगरपालिकेतील विरोधी जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे व संतोष चौधरी (दाढी) हे तीनही नगरसेवक अखेर बाजारपेठ पोलिसांना बुधवारी सकाळी शरण आले. पोलिसांनी या तीनही नगरसेवकांना ताब्यात घेऊन त्यांची जळगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
27 मार्च 2017 रोजी भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील विषयांचे पूर्णपणे वाचन करण्याच्या कारणावरुन गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवींद्र सपकाळे आणि नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) या तीनही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालून मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ व मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला. त्यांनी या तीनही नगरसेवकांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक फरार झाले होते. त्यांनी भुसावळ न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.त्यांना ताप्तुरता दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला.
अखेर बुधवारी तीनही नगरसेवक बाजारपेठ पोलिसांना शरण आले. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल हे स्वत: या संपूर्ण प्रकरणार लक्ष ठेऊन होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी आरोपी नगरसेवकांना ताब्यात घेऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे रवाना केली.