लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने त्यांच्या ज्ञानपरंपरेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे प्राचार्य डॉ. किसन पाटील खान्देशस्तरीय वाङ्मय पुरस्कार आणि प्राचार्य डॉ. किसन पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार या दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
खान्देशस्तरीय वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे असेल. या पुरस्कारांसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार या खान्देशातील लेखकांकडून कथा, कविता, कादंबरी, ललित, संशोधन अशा सर्वच वाङ्मयप्रकारातील पुस्तक, ग्रंथ ग्राह्य धरण्यात येतील. राज्यस्तरावरील वाङ्मय पुरस्कार आलटूनपालटून एकेका वाङ्मयप्रकारासाठी देण्यात येतील. यावर्षी कथा या वाङ्मयप्रकारासाठी पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कथासंग्रह यावर्षी पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे असेल. या दोन्ही पुरस्कारांसाठी इच्छुकांनी संबंधित वाङ्मयप्रकारातील १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्रत्येकी दोन प्रती, अल्पपरिचय व पासपोर्ट आकारातील छायाचित्र २५ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १२ जूनला प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या जन्मदिनी पुरस्कार जाहीर करण्यात येतील.
पुरस्काराबाबत प्रवेशिका महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांच्या नालंदा, प्लॉट नं. २६, गट नं. १६, तर १७, एन. रामाराव गृहनिर्माण सोसायटी, श्रीरत्न कॉलनी पिंप्राळा, या पत्त्यावर पाठवाव्यात, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.