लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील देऊलवाडे गावातील तापी नदीपात्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन गावठी दारूच्या अड्ड्यांवर तालुका पोलिसांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकला. त्यात सुमारे १ लाख रुपये किमतीचे दारू बनविण्याचे साहित्य व रसायन नष्ट केले. याप्रकरणी प्रकाश बाविस्कर, अनिल सोनवणे, प्रदीप देवचंद सोनवणे या तीन जणांविरुत्र तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देऊलवाडे गावातील तापी नदीपात्रात शुक्रवार, ७ रोजी सकाळी पहिला छापा टाकला. दारू भट्टीचालक प्रकाश शामराव बाविस्कर (रा.कांचननगर) हा पोलिसांना पाहून घटनास्थळाहून पसार झाला. यावेळी पोलिसांनी २८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. दुसऱ्या कारवाईत गावठी हातभट्टी दारू बनविणारा अनिल एकनाथ सोनवणे हा जागेवर वस्तू सोडून फरार झाला आहे. या कारवाईत तालुका पोलिसांनी २८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. तिसऱ्या कारवाईत संशयित प्रदीप देवचंद सोनवणे हा पोलिसांना पाहून फरार झाला होता. या कारवाईत ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
यांनी केली कारवाई
पोहेकॉ साहेबराव पाटील, संजय चौधरी, बापू पाटील, राजेश पाटील, विलास शिंदे, विजय दुसाने, अनिल मोरे, मनोज पाटील, महेंद्र सोनवणे, भूषण सपकाळे, ज्ञानेश्वर कोळी, दीपक कोळी, दीपक राव यांनी ही कारवाई केली.