जळगाव : कारागृहात बंद्यांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट असून त्या तुलनेत मनुष्यबळ अगदीच तोकडे आहे. या परिस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरु आहे. रिक्त पदे तातडीने भरुन मिळावेत, कारागृहाची क्षमता वाढवावी तसेच भुसावळ येथील २० एकरातील नवीन कारागृह आदी सर्वच प्रस्ताव धूळखात पडली असून वरिष्ठांकडून त्याची दखलच घेतली जात नाही.
येथील कारागृह अलीकडच्या काळात संवेदनशील बनले आहे. रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तिघांनी पलायन केल्याची घटना मागील वर्षी घडली होती, तेव्हापासून कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याआधी देखील भींतीवरुन उडी घेऊन बंद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय बाहेर देखील संरक्षण भींत बांधण्यात आली आहे. एकाही व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. कधी नव्हे इतके कडक नियम कारागृहात लागू करण्यात आले आहेत. त्याचा फायदा कारागृह प्रशासनाला होत आहे. कोरोनामुळे बंद्यांच्या भेठी बंद आहेत. शिस्त लागल्यामुळे अनेक घटनांना आळा बसला असला तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे.
अधिकाऱ्यांसह २४ पदे रिक्त
कारागृहाचा कारभार अनेक वर्षापासून प्रभारीवरच सुरु होता. मागील महिन्यात अनिल वांढेकर यांची नियमित अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. आता ४ तुरुंगाधिकारी, ५ हवालदार व १५ शिपाई अशी एकूण २४ पदे आजच्या स्थितीत रिक्त आहेत. कारागृहात १८६ पुरुष तर १४ महिला अशा २०० बंद्यांची क्षमता आहे, प्रत्यक्षात गेल्या आठवड्याच्या आकडीवारीनुसार तब्बल ३९१ बंदी कारागृहात आहेत. इतक्या मोठ्या संख्येत बंद्यांना हाताळण्यासाठी मनुष्यबळ अतिशय तोकडे आहे. फक्त दोनच अधिकारी असून कर्मचाऱ्यांचीही संख्या अगदीच नगण्य आहे.
अनेक वर्षापासून वृध्दांना जामीन नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात विविध प्रकारच्या गुन्ह्यात असलेले अनेक वृध्द पाच ते सहा वर्षापासून आहेत. त्यांना जामीनच मिळालेला नाही. त्यांच्यापेक्षा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात बंद्यांना जामीन मिळालेला आहे. जामीन नसल्याने हे वृध्द कारागृहात असून त्यात महिलांचाही समावेश आहे.