ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 -
राज्यात महा अवयवदान महोत्सव सुरू असून या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील कैदी सचिन गुमानसिंग जाधव याने मृत्यूपश्चात अवयवनदान करण्याचे संमती पत्र जिल्हा कारागृह अधीक्षक सुनील कुवर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे भरुन दिले. या कैद्याच्या निर्णयाचे उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात कौतूक केले. या वेळी 436 कैदी उपस्थित होते. बहुतांश कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला असून ते संमतीपत्र नंतर भरुन देणार आहे. महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, व जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमानिमित्त जिल्हा कारागृहात अवयवदानाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. एन. एस. चव्हाण, सुनील कुवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जी. एम फाउंडेशनचे अरविंद देशमुख, आरोग्य दीप किडनी फाउंडेशनचे डॉ. शशिकांत गाजरे, अयाज मोहसीन, सागर महाजन आदी उपस्थित होते.
मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहा मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले की, शरीर हे नष्ट होणारे आहे. मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहायचे असेल तर अवयवदान केले पाहिजे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना आपण शरीराचे कोणते अवयव कधी दान करू शकतो हेच माहिती नसते. यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानाची जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगून अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली. कैद्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण वेगळा आहे. असे सांगून सुनील कुवर म्हणाले की, कैदीहा कधीही वाईट नसतो तर त्याला परिस्थिती वाईट बनविते. कैद्यांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता आपणही समाजाचेच घटक आहोत असे समजून वागावे. कारागृहात आल्यानंतर त्यांच्यात निश्चित बदल होत असतो. याचे उदाहरण म्हणजे कैद्यांनी आज केलेला अवयवदान संकल्प होय. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा संकल्प करून समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचेही कुवर यांनी सांगितले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. अवयवदान जनजागृती कार्यक्रमानंतर अनेक कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला. प्रातिनिधीक स्वरुपात बंदी सचिन जाधव याने अवयवनदान संमती पत्र भरून दिले. उपस्थित कैद्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली. प्रति™ोचे वाचन विलास बोडके यांनी केले. ज्ञानेश्वर पांढरे, आनंदा पाटील यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सागर महाजन यांनी आभार मानले.