आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११: दीर्घ प्रतीक्षा करुनही कैद्यांशी भेट न होणे अथवा झालीच तर अवघ्या दोन मिनिटात भेट आटोपणे यामुळे कैदी व नातेवाईक यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी शनिवारी रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कैद्यांची मनमोकळीपणे भेट घेण्याची संधी कारागृह प्रशासनाने उपलब्ध करुन दिली होती. मनमोकळी भेट झाल्याने कैदी भारावून गेले होते. या भेटीतून कैदी व नातेवाईकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
कैद्यांच्या मनातील नैराश्य दूर व्हावे यासाठी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी शनिवारी कारागृहातील सर्व कैद्यांना त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना मुक्तपणे भेटण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यानुसार प्रभारी कारागृह अधीक्षक सुनील कुंवर यांनी सकाळी ९ ते दुपारी दीड या वेळेत सर्व कैदी व त्यांच्या नातेवाईकांना मुक्तपणे भेटण्यासाठी कारागृह खुले केले होते.
आठवणींनी दिले हुंदकेकारागृहात आलेले कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आहेत. जन्मत: कोणी गुन्हेगार नसतो. अनेक वेळा कळत न कळत माणसाच्या हातून चुका होतात. गुन्हा घडल्यानंतर पश्चाताप होतो, त्यामुळे अशा घटनांमधूनही बोध घेता येतो व त्यातून मार्गही निघतो अशा शब्दात अनेक नातेवाईकांनी कैद्यांना धीर दिला. यावेळी कैदी व नातेवईकांना हुंदके आवरणे कठीण झाले होते. या भेटीत महिलांची संख्या लक्षणिय होती. महिलांसोबत आलेल्या त्यांच्या मुलांना कैद्यांनी अलिंगन देत चुंबन घेतले. अनेक नातेवाईकांच्या खूप दिवसानंतर भेटी झाल्या. जिल्ह्यातील कानाकोपºयातून नातेवाईक आले होते.