पारोळा : तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय पदविका प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकीय डॉक्टरांची बैठक पारोळा येथील नवनाथ मंदिरात १४ जुलै रोजी पार पडली. १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
पदविका व प्रमाणपत्रधारकाची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४च्या पहिल्या अनुसूचितांना समाविष्ट करणे तसेच शासन अधिसूचना २७ ऑगस्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना निर्गमित करणे, राज्य स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची रिक्त पदे त्वरित भरण्याबाबत, राज्यात बारावीनंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धनविषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करणे आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र यांना जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत सर्व मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले जाणार आहे. तालुक्यातील कोणतेही पशुवैद्यक सेवा देणार नाहीत, असे तालुका अध्यक्ष डॉ. विजय वंजारी, उपाध्यक्ष डॉ. उदय पाटील व डॉ. सचिव संदीप पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, डॉ. डी. पी. पाटील व तालुक्यातील सर्व खासगी पशुवैद्यक उपस्थित होते.