सलग तिसऱ्या वर्षी त्रिशताब्दी पूर्ण केल्याने परिसरातील पुढील रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढील मे २०२२ पर्यंत सुटला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मन्याड धरण शंभर टक्के भरले. यावर्षी याच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फक्त ३० ते ३५ टक्के धरणात साठा होता; परंतु गेल्या आठवड्यात चार, पाच दिवस संततधार पाऊस चालल्याने विशेषकरून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नारळा, पारळा या परिसरात पाऊस जास्त पडल्याने तसेच मन्याड धरणावरील माणिकपुंज धरण यावर्षी लवकर ओव्हर फ्लो झाले. त्याचा फायदा मन्याडसाठी महत्त्वाचा ठरला. अवघ्या आठच दिवसांत मन्याड ३५ वरून १०० टक्के भरले. सलग तिसऱ्या वर्षी हॅट्ट्रिक करत सर्वांना सुखद धक्का दिला. गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात व यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट क्रांती केल्याने परिसरात कौतुकाचा विषय झाला आहे.
धरण भरले विहिरी, नदी, नाले अर्ध्यावर
धरण भरले म्हणून पुढील रब्बी हंगामाचा विषय संपला; परंतु आता चालू खरीप पिकांचे काय? कारण रोहिणी नक्षत्रात जे दोन-तीन जोरदार पाऊस झाले त्याच्यानंतर दीड, दोन महिने पाऊसच पडला नाही. या कालावधीत मोठा खंड पडला. दीड-दोन महिन्यांनंतर जो आला, तोही सलग चार, पाच दिवस रिमझिम पाऊस पडला. या पावसाने शेतकऱ्यांचे पांढरे सोन्याचे (कपाशीचे) मोठे नुकसान केले. जवळजवळ ५० टक्के फुलपाती गळून मोठे नुकसान झाले. जेमतेम विहिरींना पाणी उतरायला सुरुवात झाली. अजून पुन्हा पावसाला ब्रेक त्यामुळे विहिरी, नदी, नाले अर्धे भरले नाही.
अकरा वर्षांत मन्याड किती टक्के भरले..
मन्याड धरणाची वर्षनिहाय आकडेवारी
१) सन २०११-१२मध्ये- १०० टक्के
२) सन २०१२-१३मध्ये - १२ टक्के
३) सन २०१३-१४ मध्ये-१०० टक्के
४) सन २०१४-१५मध्ये-४९ टक्के
५) सन २०१५-१६मध्ये-१८ टक्के
६) सन २०१६-१७मध्ये-१०० टक्के
७) सन २०१७-१८मध्ये-६३ टक्के
८) सन २०१८-१९ मध्ये-शून्य टक्के
९) सन २०१९-२०मध्ये-१०० टक्के
१०) सन २०२०-२१मध्ये-१०० टक्के
११) सन २०२१-२२मध्ये-१०० टक्के
धरणाची क्षमता
धरणाची एकूण लांबी १४१० मीटर असून, सांडव्याची लांबी २६७ मीटर आहे.
धरणात एकूण ८७१ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्र म्हणून गेली आहे.
धरणाचा एकूण साठा १९०५ दलघफू (५३.१५ दलघमी)
जिवंत साठा १४२२ दलघफू (४०.२७ दलघमी)
मृत साठा ४८३ दलघफू (१३.६८ दलघमी)
सिंचन क्षेत्र ४८६४ हेक्टर
कालव्याची लांबी २० कि. मी.
४३ कर्मचाऱ्यांचा भार अवघ्या ४ कर्मचाऱ्यांवर
मन्याड धरण १०० टक्के भरणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या धरणाचा रहाटगाडा चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मन्याड धरणाच्या पाणी वाटपासाठी दोन शाखांचे विभाजन केले आहे. शाखा क्रमांक १ व शाखा क्रमांक २ असे सुरुवातीपासूनच विभाजन करण्यात आले आहे. १९७३-७४ मध्ये धरणाची निर्मिती झाली तेव्हापासून तर मधल्या काहीकाळापर्यंत धरणावरील वाॅचमनसह दोन्ही शाखा मिळून जवळ जवळ ५५ ते ६० कर्मचाऱ्यांचा स्टाफ होता. नंतर हळूहळू कुणी सेवानिवृत्त तर कुणी दुसरीकडे असे एक एक कर्मचारी कमी कमी होत गेले. आजही ४३ कर्मचाऱ्यांची नितांत गरज असताना अवघ्या चारच कर्मचाऱ्यांवर मन्याडचा गेल्या कित्येक वर्षांपासून भार आला आहे.