जळगाव : बीएचआर प्रकरणात सुनील झंवर याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला शरण आला असून सोमवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तो न्यायालयाला शरण आल्याने अटकेची कारवाई करता आली नसल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचिता खोकले यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, फरार घोषित होण्याचे वॉरंटही न्यायालयाने रद्द केले आहे.
बीएचआरमधील ठेवीदारांची फसवणूक व अपहारप्रकरणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारीला घोषणापत्र जारी केले होते. त्यानुसार तीस दिवसांच्या आत अर्थात १४ मार्चपर्यंत दोघा मुख्य संशयितांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वांरट काढण्यात आले होते. दरम्यान, पुढील आठवड्यात वॉरंटची मुदत संपुष्टात येऊन दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते. त्याचबरोबर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र, त्यापूर्वी सुनील झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला शरण आला आहे. त्याने वॉरंटही रद्द करून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने झंवर याला १८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. झंवर हा न्यायालयाला शरण आल्याने तूर्तास अटकेची कारवाई टळली आहे. मात्र त्याला विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची संधी उच्च न्यायालयाने दिली आहे. शरण आल्याने मालमत्ता जप्तीचेही संकट टळले आहे.
कंडारेचाही अटकपूर्व जामीन अर्ज
जितेंद्र कंडारे यालाही १४ मार्चपर्यंत शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. त्यापूर्वी त्याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़. दरम्यान, सूरज झंवर यानेही मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर १० मार्चला निकाल होईल. संशयित विवेक ठाकरेच्याही जामीन अर्जावर २४ मार्च रोजी निकाल आहे.