जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवात होणारा विठ्ठल नामाचा अखंड गजर यंदा काहीसा कमी झाला ताे कोरोनामुळे. तसेच याच कोरोनामुळे रथाची ग्राम प्रदक्षिणा न होता केवळ परंपरेसाठी जागेवरच रथ ओढण्यात आला.
भाविकांविना पिंप्राळा नगरी सुनी-सुनी
१४४ वर्षांची परंपरा असलेल्या या रथोत्सवातही खंड पडला तो देखील कोरोनामुळेच. दरवर्षी रथोत्सवानिमित्त मंदिर व रथाला रंगरंगोटी तसेच विद्युत रोशणाई करण्यात येते. या रथोत्सवानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी पिंप्राळानगरीत दाखल होतात. मात्र यंदा निर्बंधांमुळे भाविक मोठ्या संख्येने येऊच शकले नाही.
या रथोत्सवानिमित्त पिंप्राळ्यात यात्रा भरत असते. त्यामुळे विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारची खेळणी विक्रीची दुकाने येथे पिंप्राळा रिक्षा स्टॉप चौकात थाटलेली असतात. तसेच फराळ तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम देखील होतो मात्र यंदा हे काहीच होऊ शकले नाही.