उद्योगांचे चाक मंदावले : दुकाने बंद असल्याने पाइपची मागणी घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी जे उद्योग अत्यावश्यक सेवेत येत नाही ते बंद आहे. यामध्ये जळगावातील मोठा उद्योग असलेला चटई उत्पादन बंद असून, दहा हजार कामगारांच्या हातचे काम थांबले आहे. यासोबतच पाइप उद्योग सुरू असला तरी दुकाने बंद असल्याने पाइप विक्रीत घट झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व सर्वत्र लाॅकडाऊन झाले. यामध्ये उद्योगदेखील बंद राहिले. यामुळे उद्योग क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका सहन करावा लागला. संसर्ग कमी झाल्यानंतर हळूहळू उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येऊ लागले, मात्र त्यानंतर पुन्हा आता कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधादरम्यान उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये जे उद्योग अत्यावश्यक सेवेत येत नाही ते उद्योग बंद आहे.
प्रमुख उत्पादन थांबले
जळगावातील प्लॅस्टिक उद्योग मोठा असून, या ठिकाणाहून विविध प्लॅस्टिकची उत्पादने देशासह विदेशात पाठविली जातात. यामध्ये चटई उद्योग मोठा असून, या निर्बंधांत चटई, प्लॅस्टिक दाणे तयार करण्याचा उद्योग बंद आहे. चटईच्या ५०० कंपन्या असून, या कंपन्या बंद असल्याने दहा हजार कामगारांच्या हातचे काम गेले आहे.
पाइपची विक्री घटली
जळगावातील चटईसह पाइप उद्योगदेखील मोठा असून, सध्या हा उद्योग सुरू आहे. मात्र असे असले तरी दुकान बंद असल्याने पाइप विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यासोबतच प्रवासावरदेखील निर्बंध असल्याने ग्रामीण भागातून शेतकरीदेखील पाइप खरेदीसाठी येऊ शकत नाही. यामुळे पाइप विक्री कमी झाली आहे. कोरोनामुळे कच्च्या मालाची आयात कमी झाल्याने त्यांचे भाव वाढल्याने पाइपचे भावदेखील थेट दुप्पट झाले आहे. यामध्ये अडीच इंची पाइपची किंमत ३८० रुपयांवरून साडेसहाशे रुपयांवर पोहोचली आहे.
निर्बंधामुळे उत्पादनावरही परिणाम
धान्य खरेदी विक्री दुकानांच्या वेळा मर्यादित करण्यात आल्याने कच्चामाल मिळण्यास उद्योगांनाही अडचण येत आहे. त्यामुळे दालमिलमध्येदेखील उत्पादन कमी झाले आहे.
औद्योगिक वसाहतीतील उद्योगांची स्थिती
एकूण उद्योग १४००
चटई उद्योग ५००
दाल मिल ६५
ऑइल मिल १००
पीव्हीसी पाइप ४००
उद्योगांच्या अडचणी वेगळ्या
कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान दुकानांच्या वेळा मर्यादित केल्याने दालमिलसाठीचा कच्चामाल, धान्य उपलब्ध होण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दालमिलची गती मंदावली आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन
निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेतील उद्योग सुरू आहे. यामध्ये दालमिल, ऑइल मिल पीव्हीसी पाइप, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित उद्योग सुरू आहे, तर अत्यावश्यक सेवेत येत नाही ते उद्योग बंद आहे. यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.
- सचिन चोरडिया, सचिव, 'जिंदा'
पाइप उद्योग सुरू असला तरी दुकाने बंद असल्याने व वाहतुकीवर निर्बंध असल्याने शेतकरी खरेदीसाठी येऊ शकत नाही. त्यामुळे पाइप विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन करावे लागत आहे.
- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, जळगाव पाइप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असोसिएशन
गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे अनेक दिवस हाताला काम नव्हते. त्यानंतर उद्योग सुरू झाले व आम्हाला दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा निर्बंधादरम्यान हातचे काम गेल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- गणेश चौधरी, कामगार
हाताला काम मिळून सहा महिने होत नाही तोच पुन्हा उद्योग क्षेत्रावर निर्बंध आल्याने पुन्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गात उपचारासाठी खर्च वाढला असताना हातचा रोजगारदेखील गेल्याने मोठे संकट ओढवले आहे.
- समाधान जाधव, कामगार