सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्यापरिषदेतून निर्वाचित अध्यापक गटातून प्रा. महेंद्र रघुवंशी तर महिलांमधून डॉ.पवित्रा पाटील हे निवडून आल्याची घोषणा विद्यापरिषदेच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान कुलगुरुंनी अधिष्ठातांमधून प्रा. साहेबराव भुकन यांचे तर विद्यापीठ प्रशाळांमधून प्रा. सतीश कोल्हे यांचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन केले आहे.
शनिवार, दि. ६ मे रोजी विद्यापरिषदेची सभा विद्यापीठाच्या अधिसभागृहात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. या दोन जागांसाठी या दोघांचेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले. अधिकृत घोषणा कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विनोद पाटील यांनी विद्या परिषदेच्या बैठकीत केली. या सभेत प्रा. महेंद्र रघुवंशी (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) आणि डॉ. पवित्रा पाटील ( व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) यांना निवडून आल्याबद्दल कुलगुरुंच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
दोन जणांचे नामनिर्देशन
दरम्यान, शनिवारी कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ३० (घ) आणि (ड) नुसार व्यवस्थापन परिषदेवर दोन जणांचे नामनिर्देशन केले. त्यामध्ये अधिष्ठातांमधून आंतर विषय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. साहेबराव भूकन (सानेगुरुजी विद्या प्रबोधिनीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा) यांचे मार्च २०२५ पर्यंत आणि विद्यापीठ प्रशाळेचे संचालकांमधून प्रा.सतीश कोल्हे (संचालक, संगणकशास्त्र प्रशाळा) यांचे एक वर्षासाठी नामनिर्देशन करण्यात आले आहे.