अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे थोडा वेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी २ वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला.
अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे हे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांची विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. त्यानंतर किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मंडपात गोंधळ उडाला.
यानंतर रणजीत शिंदे यांनी शोभणे यांना पेढा भरवून तोंड गोड केले. त्यावेळी बोलताना शोभणे म्हणाले की, आपण सर्व एकच आहोत. जसा गोड पदार्थ खाऊ घातला. तसे मनेही गोड करा, असे आवाहन शोभणे यांनी केले. आणि ते तिथून निघून गेले.
शोभणे म्हणाले की, येथील गर्दी पाहून आनंद झाला आहे. मात्र तरीही हा अनुभव वाईट होता. चला, चला म्हणजे काय आम्ही अस्पृश्य आहोत का, असा सवालही त्यांनी केला.
यानंतर प्रा.शोभणे तिथून निघून गेले...प्रा.शोभणे यांचे मी स्वागत केले. मी या संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी त्यांना निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी जर म्हणत असेल घरापर्यंत सोडा तर ते कसे काय शक्य आहे. - डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.अमळनेर.