श्याम सोनवणे/संजय पाटीलअमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, पूर्वनियोजित कार्यक्रमाला अडथळा का आणत आहात म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. हा प्रकार रविवारी दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. त्यानंतर निमंत्रक रणजित शिंदे यांनी प्रा. शोभणेंना गोड घास भरवत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
प्रा. शोभणे दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात पोहोचले. तिथे त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची गळाभेट घेतली. या वेळी राज्य विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना चला, चला असे म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला.
मुलाटे यांना भेटायला आलो होतो. त्यांची भेट घेतली. मात्र त्यापूर्वीच चला-चला असे काहीजण म्हणाले. हा प्रकार वाईट आहे. मुलाटे जाताना भेटायला आले नाही. का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे. - डॉ. रवींद्र शोभणे, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन.
शोभणे यांचे स्वागत केले. मी संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्यासाठी कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तो सोडून मी निरोप देण्यासाठी जाऊ शकत नाही. कोणी म्हणत असेल घरापर्यंत सोडा ते कसे शक्य आहे.-डॉ. वासुदेव मुलाटे, अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन.