ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.12 - माहिती तंत्रज्ञानाबाबत देशात पाहिजे त्या गतीने अजूनही बदल होत नसल्याचे दिसून येते. हे बदल वेगाने घडायला हवेत. डिजिटल शिक्षणाबाबत फारशी साक्षरता नाही. पण आपण अजूनही पदवी प्रतिष्ठेत जगतो. दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले म्हणजे आपण परिपूर्ण असतो, असे नाही. व्यावसायिक शिक्षण हेच देशाचे भवितव्य आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायला हवेत, असे मत अखिल भारतीय माहिती तंत्रज्ञान शिक्षण बोर्डाचे सदस्य व रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3131 चे माजी गव्हर्नर डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
डॉ.दीपक शिकारपूर यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी डॉ.शिकारपूर यांचे स्वागत केले. यावेळी रोटरी इस्टचे अध्यक्ष संजय शहा उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, देशातील स्थिती, सायबर क्राईम आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
डॉ.शिकारपूर म्हणाले, तंत्रज्ञान बदलत आहे. अॅप आले. आता पुढे आणखी नवीन काही तरी येईल. अनेक संधी निर्माण होत आहे. हार्डवेअर, नेटवर्किग मेन्टनन्स यासंदर्भात अनेक कामे, प्रकल्प असतात. पण या क्षेत्रात जे कुशल आहेत, त्यांना अधिक संधी आहे. जे कुशल नाहीत त्यांच्यासमोर अडचणी येतात. आपण भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली. जे आयटी तज्ज्ञ होतात त्यांना लागलीच परदेशात जायचे असते, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी हवी असते. पण एकाच ठिकाणी हे शक्य नाही. त्यासाठी पोषक वातावरण असावे. आपल्याकडे अजूनही पदवीला प्रतिष्ठा आहे. परदेशात कौशल्य महत्त्वाचे मानले जाते. श्रमाला प्रतिष्ठा हवी. ऑटोमोबाईल अभियंताची पदवी असते, पण वाहनाचे पंक्चर दुरुस्त करता येत नाही, टायर बदलता येत नाही. शिक्षण व्यवस्थेत बदल करायला हवा. पूरक शाखेचे शिक्षण घेतले पाहिजे. अभ्यासक्रमातही बदल करणे आवश्यक आहे.
एकलव्य बनून शिक्षण घ्या
सरकारच्या कौशल्य विकास योजनेबाबत काय मत आहे, असे विचारले असता डॉ. शिकारपूर म्हणाले, सरकारबाबत मी मत मांडणार नाही. एकलव्य बनून शिक्षण आपण घेतले पाहिजे. घरबसल्याही संगणक, माहिती तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता येते. संकटे येतात, त्यातून मार्ग काढावा. विद्याथ्र्याना व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. भविष्यात त्याला खूप महत्व येईल. तसेच विद्याथ्र्याना समस्या सोडविण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक
आपल्याकडे डिजिटल यंत्रणेवर भर दिला जात आहे, दुस:या बाजूला सायबर गुन्हेही वाढत आहेत. याला प्रतिबंध कसा करता येईल? याबाबत डॉ.शिकारपूर म्हणाले, सायबर क्राईम हा गुंतागुंतीचा विषय आहे. एका प्रकरणात तर एका आयटी तज्ज्ञ व त्याच्या पत्नीचीही फसवणूक झाली आहे. फसव्या माहितीपासून सतर्क राहणे हे सर्वानी लक्षात ठेवायला हवे. बहुसंख्य सायबर गुन्हेगार हे देशाबाहेर राहून नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे खबरदारी घेवुन फसवणूक झाल्यावर पोलिसात तक्रार करावीे.
सरकारवर विसंबून राहू नका
संगणक, माहिती तंत्रज्ञान याचे शिक्षण घेण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला हवा. कुठलीही भीती बाळगायला नको. सरकारवर अवलंबून राहू नका. आपण काहीच करीत नाही व सरकारला दोष देतो, असे व्हायला नको. नागरिक, विद्यार्थी यांची मानसिकता बदलायला हवी. विद्याथ्र्यावर संस्कार करा. त्यांना चांगले नागरिक कसे बनविता येईल यासाठी शाळेतूनच प्रयत्न व्हावेत.