विजयकुमार सैतवालजळगाव : शिक्षण घेत असताना कधीही उद्योग उभारणीचा विचार केलेला नसताना केवळ आत्मविश्वासाच्या बळावर जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये चटईचा उद्योग उभारून उद्योग क्षेत्रात जळगावातील रेखा रुणवाल यांनी गगनभरारी घेतली आहे. विशेष म्हणजे स्वत:चा उद्योग संभाळत मुलांनाही उच्चशिक्षित करीत महिलादेखील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.रेखा रुणवाल यांचे माहेर नंदुरबारचे. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. मात्र उद्योग उभारणीच्या विचाराने शिक्षण घेतले नाही की त्या वेळी तसा विचारही केला नसल्याचे रुणवाल यांचे म्हणणे आहे. मात्र लग्न झाल्यानंतर जळगावात सासरी येऊन एक गृहिणी म्हणून घर संभाळत असताना सासऱ्यांचे वय झाल्याने त्यांच्याकडून उद्योग संभाळणे अवघड होत होते. त्यामुळे हा उद्योग बंद पडू नये यासाठी रेखा रुणवाल या पुढे सरसावल्या. २००८मध्ये उद्योगाची जबाबदारी स्वीकारली व उद्योग केवळ सुरूच ठेवला नाही तर तो वाढवून विकसितदेखील केला.उद्योगाची जबाबदारी संभाळली त्या वेळी मुलेदेखील शालेय शिक्षण घेत होते. एकीकडे घर, मुलांचा अभ्यास व दुसरीकडे उद्योगाची जबाबदारी या सर्व कसोटीवर मात करण्यासाठी रेखा रुणवाल यांनी वेळेचे योग्य नियोजन करीत सर्व जबाबदाºया यशस्वीरित्या पार पाडत आहे.मुलांच्या शालेय जीवनात त्यांना कोणतीही शिकवणी न लावता त्यांचा स्वत: अभ्यासदेखील घेत असत. दोन मुली, एक मुलगा यांना उच्च शिक्षित केले असून मोठी मुलगी विदेशात पोहचली आहे. दुसरी मुलगी व मुलाचे शिक्षण सुरू असून त्यांनाही मोठ्या क्षेत्रात पहायचे असल्याचा मानस रेखा रुणवाल यांचा आहे.चटई उद्योगात तशी मजुरांची मोठी गरज असते. त्यात कधी कोणी कामावर येत नाही, कोणी सोडून जाते. या व इतर कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यातून डगमगून न जाता स्वत: सर्व परिस्थिती हाताळत निर्मितीमध्ये खंड पडू देत नाही. एक महिला संभाळत असलेल्या या चटई उद्योगातील उत्पादन देश-विदेशात पोहचले आहे.आत्मविश्वास असल्यास प्रत्येक महिला यशस्वी होऊ शकते. पती, सासू-सासरे यांच्याकडून सदैव प्रोत्साहन मिळत गेले. सतत पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडून ऊर्जा मिळत गेली. मुलांनीही मला नेहमी समजून घेत कोणताही हट्ट केला नाही.-रेखा रुणवाल.
आत्मविश्वासाने उद्योगात गगन भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:03 PM