जळगाव - शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल स्वीट दुकानात प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रविवारी दुपारी छापा टाकून ९ हजार ९०० रुपयांचा गुटखा व सुंगधित तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी महेंद्र गोवर्धनदास होतूमलानी (रा. समाधान टॉवर, सिंधी काॅलनी) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल स्वीट दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजता या दुकानात छापा टाकला. यावेळी झाडाझडतीत महेंद्र गोवरर्धनदास होतूमलानी यांच्या ताब्यात दोन गाठोडे विमल पान मसाला, व्हि-वन सुगंधी तंबाखूचा साठा सापडला असून, पथकाने मालासह संशयिताला अटक केली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, फारूख अब्दुला शेख, विजय अहिरे, अमोल करडईकर, प्रकाश कोकाटे, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत यांनी केली आहे.