जळगाव : अंगावर रोमांचे उभे करणारे अनेक ऐतिहासिक प्रसंग, घटना तुम्हालाही तुमच्या शहरात थेट दिसू शकतात. त्यासाठी ‘प्रोजेक्शन मॅपिंग’ तंत्रज्ञान कामात येते. त्याच्या मदतीने ‘जाणता राजा’ या नाटकाची परिणामकारकता आणि भव्यता अधिक कशी वाढविता येईल ? यावर जळगावची प्रांजल पवार ही काम करत आहे. ती आय.आय.टी, हैदराबादला मास्टर ऑफ डिझाइनची विद्यार्थिनी आहे. तिच्या सूचनांमध्ये नाटकाच्या निर्माता संस्थेनेही स्वारस्य दाखवले असून, सविस्तर अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितले आहे.
दिल्लीतील लाल किल्ला, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया यासारख्या ऐतिहासिक स्थळी प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे अनेक प्रसंग प्रेक्षकांसमोर उभे करण्यात येतात. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. हे तंत्रज्ञान जरी नवीन नसले, तरी त्याचा वापर महाराष्ट्रातील नाट्यक्षेत्रात आजवर झालेला नाही. त्याची सुरुवात प्रांजली पवार करू पाहत आहे, तीही छत्रपती शिवाजी महाराजांवरील ऐतिहासिक महानाट्यापासून. ३० सेकंदांच्या रील्स पाहण्यावर भर देणाऱ्या तरुणाईला या नाटकाशी जोडण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.
अधिक भव्यता येणार...प्रोजेक्शन मॅपिंगमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग, तेव्हाचा किल्ला अधिक भव्य रीतीने दाखविणे शक्य होणार आहे. युद्धाचा प्रसंग असल्यास हजारोंच्या संख्येतील सैन्य प्रेक्षकांच्या समोर आणता येईल. व्हिज्युअल इफेक्ट दाखविणे सोपे होईल. यासाठी नाटकाची स्क्रिप्ट, सेटमध्ये कोणताही बदल करावा लागणार नाही.
जळगावमध्ये जाणता राजा नाटक पाहिल्यानंतर प्रोजेक्शन मॅपिंग कुठे-कुठे वापरता येईल याची माहिती नाटकाचे निर्माता महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, पुणे यांचे सचिव अजित आपटे यांना दिली असून, त्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले आहे. आपटे यांनी सविस्तर माहिती मागवली आहे. येत्या जूनपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे, अशी माहिती प्रांजली पवार (जळगाव) हिने दिली.