नंदुरबार : इंग्रजीला न तोडता मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठी शासकीय धोरणांमध्येदेखील बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केली.नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे जिल्हा साहित्य संमेलन रविवारी नंदुरबारात झाले. त्याचे उद्घाटन डॉ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डॉ.अक्षयकुमार काळे पुढे म्हणाले, संस्कृती संवर्धनासाठी भाषा हा मुलभूत घटक आहे. जगाची दारे उघडायची असतील तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही ही मानसिकता आहे. शासकीय धोरणांचा कलही तसाच आहे. परिणामी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खैरात वाटल्यासारखी परवानगी देण्यात आली.
इंग्रजीला न तोडता मराठीचे संवर्धन करा
By admin | Published: March 05, 2017 11:54 PM