लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या गेल्या एक ते दीड वर्षांपासून रखडल्याने अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदावर काम करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात किंवा अतिरिक्त पदावर कामकाज करण्याचे वेतन देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जिल्हा शाखा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन अधिनियम १९८१मधील कलम ५६नुसार जेव्हा एखाद्या शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात येतो, तेव्हा अशा अतिरिक्त पदाकरिता अतिरिक्त वेतन देण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत आज अनेक शाळा, केंद्र स्तरावर व बिटस्तरावर अनुक्रमे ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आपले स्वतःचे मूळ आस्थापना सांभाळून अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. अतिरिक्त पदभार सांभाळायची परिस्थिती ही निव्वळ जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पदोन्नती प्रक्रिया पार पाडत नसल्याने निर्माण झाली आहे. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह पदवीधर शिक्षक कर्मचाऱ्यांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे शालेय व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होत असून, अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनामार्फत ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या पदांची पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली जात नसेल तर स्वतःचे पद सांभाळून प्रभारी अतिरिक्त पदावर कामकाज करणाऱ्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना अतिरिक्त वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा यांना देण्यात आले असून, या निवेदनावर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जगन्नाथ कोळी व जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.