अलिकडे समाज जीवन व सण समारंभामध्ये सुधारणावादाच्या नावावर चुकीच्या प्रथा आणि पद्धतींना प्रोत्साहन दिले जाताना दिसत आहे. चूक म्हणून चूक वागणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सुधारणावादी दाखवून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही वेगळी गोष्ट. चूक म्हणून चूक करणे आणि वागणे किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे तर गंभीर आहेच परंतु सुधारणावादाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे जास्त गंभीर आहे, असे मला वाटते. त्यासाठी एका गोष्टीचे उदाहरण देऊन अधिक स्पष्टीकरण करता येईल.ए क घोडेस्वार एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतो. त्याला रस्त्यात एका रुग्ण वाटसरू भेटतो. रुग्ण वाटसरू त्याला घोड्यावरून जाण्यासाठी घोडेस्वारास विनंती करतो. रुग्णाला मदत करण्याच्या हेतूने घोडेस्वार त्याला घोड्यावर बसवून घेतो. काही अंतर गेल्यावर निर्जनस्थळी रुग्ण सांगणारी व्यक्ती घोडेस्वाराजवळील चिजवस्तू लुटून घेते व त्यास जंगलातच फेकून निघून जाऊ लागले. त्यावेळी घोडेस्वार त्यास सांगतो, तू चोर दरोडेखोर, लुटारू आहेस आणि मला लुटले.माझा घोडा पळवला याचे मला वाईट वाटत नाही, परंतु तू रुग्णाईताचे सोंग घेऊन मला फसवले, याचे मला दु:ख आहे. कारण यापुढे अशा घटनेमुळे खºया व गरजू रुग्णाईतावरसुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही आणि त्याला मदतीची गरज असताना मदत मिळणार नाही. तद्वतच सुधारणावादाचे नाव घेऊन व महापुरुषांचे नाव घेऊन कुणी चुकीचे वागत असेल तर ती जास्त गंभीर गोष्ट आहे.एवढी सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे मागे एका ‘शिवविवाह’ पद्धतीने घडविलेल्या विवाहाला गेलो असताना आलेला अनुभव मन उद्विग्न करणारा आहे. छत्रपती शिवराय हे युगपुरुष होते. त्यांच्या नुसत्या नामोच्चारानेच आपण पवित्र होऊन जातो, एवढे सामर्थ्यपण त्याच महाराजांच्या नावाने घडविण्यात येणाºया विवाह कार्यक्रमात मी ‘प्रीवेडींग’ शुटिंग (विवाहपूर्व चित्रण) पाहिले आणि मन उद्विग्न झाले. ज्या पद्धतीने वधूवरांचे चित्रीकरण करण्यात आले होते त्यावरून कोणता संदेश त्यातून समाजाला द्यावयाचा आहे किंवा काय सुधारणा घडावयाची आहे न कळे? तसेच दुसरा अनुभव त्याच पद्धतीच्या विवाह समारंभात नेतेमंडळींचा सत्कार, भाषणे त्यातून वेळेचा अपव्यय. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला?एका बाजूला बडेजाव, झकपकपणा, दिखावूपणा आणि दुसºया बाजूला वेळेचा अपव्यय, गैरव्यवस्था येणाºया पैपाहुण्यांची आणि आप्तेष्टांची होणारी गैरसोय आणि आबाळ. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला न कळे? काय सुधारणा करू इच्छितो आम्ही? काय संदेश देऊ इच्छितो समाजाला.तसेच दुसरे उदाहरण- कार्पोरेट कल्चर आणि उच्चभ्रू संस्कृतीबाबतचे. आम्ही कार्पोरेट कल्चरमध्ये वावरतो किंवा उच्चभ्रू संस्कृतीत वावरतो म्हणजे आम्ही सुधारणावादी आहोत, मागास विचारांची कास आम्ही कधीच सोडली आहे, असे म्हणत कुटुंबातील वडीलधारी माणसे, तरुण मुले, मुली आणि सुना यांचे वागणे बेताल होत चालले आहे.उदाहरणार्थ या कार्पोरेट कल्चरच्या नावाखाली आॅफिसचा म्हातारा बॉस आणि त्याचा नुकतेच मिसरुड फुटलेला तरुण सहकारी हे तर एकत्र मद्यप्राशन करताय, परंतु आता वडील-मुलगा, काका-पुतणे, सासरा-जावई, भाऊ-भाऊ हे सर्रास एकत्र बसून मद्यप्राशन करतात. झिंगतात प्रसंगी नशेत भांडतातही आणि त्याला आम्ही नाव दिलं ‘कार्पोरेट कल्चर.’आम्ही सुधारणावादी आहोत, मुलींना, सुनांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आम्ही देतो, असं म्हणत म्हणत वेशभूषा, केशभूषा याबाबतीत तर आमचा स्तर घसरलाच, पण आता अनेक कुटुंबामध्ये सण समारंभात आणि लग्नकार्यात महिलांचे रस्त्यावरचे नृत्यकामही कोणत्या थराला गेले याचा आपणच विचार करायला हवा आणि ‘कार्पोरेट कल्चरच्या’ नावाखाली आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबामध्येदेखील ‘महिला मद्यपानाला’ मान्यता मिळताना दिसत आहेत, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे, असे मला वाटते.-विलास भाऊलाल पाटील, जळगाव
चुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:46 AM