लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या तसेच वर्षानुवर्षे रखडलेल्या पदोन्नत्यांमुळे पंचायत राज समितीसमोर पंचायत नको म्हणून अखेर आरोग्य विभागाने या कामाला गती दिली आहे. यात जिल्हा परिषदमध्ये तालुकास्तरावरून कर्मचारी बोलावून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील पदोन्नत्या व १०,२०,३० कालबद्ध रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. कर्मचारी कमतरतेमुळे हा मुद्दा मार्गी लागत नसल्याचे सांगण्यात येत होते. आता काही कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. यात आरोग्यसेवक, आरोग्य सेविका व अन्य पदाच्या कर्मचाऱ्यांचे सीआर भरणे, कागदपत्रांची तपासणी, सेवा पुस्तिका याची पडताळणी करण्यात येत आहे. यासह सर्व कागदपत्रे तपासून नवीन डाटा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून आगामी महिन्यात कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन आरोग्य विभागाचे आहे.