लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संकटग्रस्त व पीडीत महिलांसाठी सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून एकाच छताखाली वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. या सेंटरच्या माध्यमातून विविध समस्या मार्गी लावल्या जात असून आतापर्यंत २० महिलांना या केंद्राच्या माध्यमातून आधार मिळाला आहे.
संकटग्रस्त व पीडीत महिलांसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली आरोग्य विषयक, कायदे विषयक, मानसशास्त्रीय, समुपदेशन, तात्पुरता निवारा, हेल्पलाईन नंबर इत्यादी व यासारख्या सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात हे सेंटर कायमस्वरुपी जागेत सुरू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात शासकीय आशादीप महिला वस्तीगृह येथे सुरू करण्यात आले असून यासाठी संपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत विविध विभागांची मदत घेऊन आलेल्या समस्या मार्गी लावल्या जात आहे.
वृद्धा पुन्हा भेटली भावाला
महिलांना मदत करण्याच्या कामात या सेंटरचे जाळे देशभर असल्याने त्याचा सकारात्मक अनुभव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील वृद्धेला आला. पाचोरा येथील ६० वर्षीय वृद्धा घरून निघाल्यानंतर ती थेट गुजरातमध्ये पोहचली होती. तेथे वन स्टॉप सेंटरच्या संपर्कात ही महिला आल्याने या सेंटरने तिची माहिती मिळविली असता ती पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील असल्याची व मुलगी जळगावातील जैनाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी या सेंटरने जळगावातील वन स्टॉप सेंटरवर संपर्क साधला असता जळगावातील केंद्राने जैनाबाद व वरखेडी येथे तपास केला. त्या वेळी या महिलेचा भाऊ गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून महिलेच्या भावाशी संपर्क साधून माहिती दिली व या वृद्धेला तिच्या भावासोबत पाठविण्यात आले.
केंद्राकडून संकटग्रस्त महिलांना तत्काळ मदत
कोणत्याही कारणाने संकटात सापडलेल्या महिलांना आधार देण्यासाठी या केंद्राच्यावतीने काम केले जाते. यामध्ये कौटुंबिक समस्या असो, पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसेल, न्यायालयीन कामकाजासाठी काही मदत हवी असल्यास तसेच समुपदेशन करण्यासाठी या केंद्राकडून पुढाकार घेतला जातो.
विनामूल्य सेवा
संकटग्रस्त महिलांसाठी देशभर केंद्र सरकारच्यावतीने ही योजना सुरू करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेचा महिलांना विनामूल्य लाभ घेता येतो व त्यासाठी महिला हेल्पलाईन क्रमांकदेखील सुरू करण्यात आला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी
वन स्टॉप सेंटरमध्ये महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असल्याचे अनुभव आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या असल्याची माहिती मिळाली. सध्या कौटुंबिक हिंसाचारासह पोलिसांकडून तक्रारी दाखल करून घेण्यास नकार, न्यायालयात धाव घेण्यासाठी काय करावे, घरच्या मंडळींकडून मारहाण, पती, सासरचे मंडळींचे समुपदेशन करणे अशा तक्रारी येत आहेत.
आलेल्या तक्रारी
- जळगाव - १८
- चाळीसगाव - १
- पाचोरा - १