नशिराबाद : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचा जोर वाढत असून, उमेदवारांची प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे. यामध्ये सध्या सोशल मीडियावर प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. वॉर्ड बैठका, गाव बैठका, घरोघरी व चौकाचौकांत रणनीतीसाठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या फैरी सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारदस्त मिक्सिंग केलेले व्हिडिओ ऑडिओ उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांच्या जुन्या प्रचार यंत्रणेत दिवसेंदिवस बदल होत आहे.
आता नाही, तर पुन्हा नाही.
हजार-पाचशेच्या नादी लागू नका. आता नाहीतर, पुन्हा नाही. आपला माणूस हक्काचा माणूस, इतिहास वाचायला नाहीतर रचायला आलोय, कोरोनात गावबंदी करणारे आता गावाला या म्हणून आग्रह करतील. इच्छुक उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. यंदा डोअर टू डोअर प्रचाराच्या फेरीआधी सोशल मीडियावर दणदणीत प्रचार सुरू आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ, ऑडिओ व मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियावर दिसत आहे. काहींनी तर भावी सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक असे पद लावून प्रचार तंत्र अवलंबत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची बांधणी सुरू आहे. अद्याप नामनिर्देशनपत्र भरणे आणि काढणे अशा बऱ्याच गोष्टी पढ़े असल्या तरीही गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचाराचा धडाका सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसत आहे.
नशिराबाद येथे इच्छुक उमेदवारांनी तर आतापासूनच सोशल मीडियावर आपला प्रचार तंत्र अवलंबत असल्याचे दिसून येते. नगरपंचायत की ग्रामपंचायत हा निवडणुकीचा तिढा अद्याप कायम असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियावर कधी न चमकणारे आज प्रचाराच्या माध्यमातून चमकत असल्याचे दिसून येते, तर काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्रचार तंत्र सुरू केले आहे नशिराबाद येथे अद्याप एकाही जणाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया अनेकांची पूर्णत्वास आली आहे.