जळगाव : सोशल मीडियाचा योग्य उपयोग केला तर आयुष्य समृद्ध होईल. कारण काही शिक्षण-प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर त्यासाठी सोशल मीडियाची मदत ही नक्कीच होते. सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नंतरच सकारात्मक गोष्टी घडतील आणि त्यातून फक्त युवक-युवतींचा स्वत:चाच नाही तर राज्याचा देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले़
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय येथे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातंर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता युवती सभा उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमानिमित्त युवक-युवती आणि सोशल मीडिया या विषयावर एक दिवसीय वेबिनार पार पडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत महाजन, डॉ. शाम सोनवणे, प्रा. डॉ. सुनिता चौधरी, प्रा. डॉ. कल्पना भारंबे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनिता चौधरी यांनी केले. आभार डॉ. शाम सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमात डॉ. पंकजकुमार नन्नवरे, डॉ. पवन भोळे यांचाही सहभाग होता.