जळगाव : शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या वाढल्या आहेत. घर बंद असल्याची संधी साधत, चोरटे लाखोंचा माल चोरून नेत आहेत. मात्र, घरफोडी झालेल्या बहुतांश ठिकाणी लाखोंच्या मालमत्तेला व घरातील मौल्यवान सामानाच्या सुरक्षिततेसाठी घराला चांगले दर्जाचे दणकट कुलूप न लावता शंभर ते सव्वाशें रुपयांचे कुलूप लावले जात असल्याचे आढळून आले. कुलूप खरेदी करताना करण्यात येणारी काटकसर चोरट्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
सर्वसामान्य व्यक्ती हे महागाचे घर घेतो. मात्र त्याच्या सुरक्षेसाठी लागणारे कुलूप मात्र ५० ते १०० रुपयांपर्यंतचे लावत आहे. काही नागरिक तर अगदी ३० ते ४० रुपयांपर्यंतचे कुलूप खरेदी करीत असल्याचे आढळून आले. कुलुपाची दणकटता न पाहता, नागरिक सहजपणे जास्तीत जास्त १०० रुपयांपर्यंत कुलूप घेतात. बाजारात विविध कंपन्यांचे ५० रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत कुलूप विक्रीला आहेत. परंतु, नागरिक स्वस्त कुलुपाचीच मागणी करतात. १०० रुपयांपर्यंतचे कुलूपही चांगल्या प्रतिचे असले तरी, त्याहून जास्त किमतीचे आणि दणकट कुलूप बाजारात विक्रीला असताना, नागरिक मात्र दोनशेंपर्यंतचे कुलूपदेखील घेत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तर बोटावर मोजण्याइतकेच ग्राहक महागडे कुलूप खरेदी करत असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
या कुलुपांना जास्त मागणी (टक्क्यांत)
नॉब लॉक्स : ५ टक्के
कॅप लॉक्स : ३ टक्के
ठेडबोल्ड लॉक्स : २ टक्के
पॅड लॉक्स : ८० टक्के
मोर्टीस लॉक्स : ५ टक्के
इन्फो :
दणकट आणि महाग कुलूप : १० टक्के
कमी दणकट आणि कमी महाग कुलूप : ८० टक्के
अगदीच कमी दणकट आणि स्वस्त कुलूप : १० टक्के
इन्फो :
राऊंड पॅडलॉक : १,५०० रु.
मोर्टीस लॉक्स : १०,००० रु.