जळगाव: कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकत्र करून त्यांची समूह शाळा तयार केली जाणार असून, त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाच तालुक्यातून प्रत्येक एक प्रस्ताव दाखल झालेला होता.
राज्यात समूह शाळा तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समूह शाळा उभारण्याचे प्रस्ताव मागवले आहेत. त्याला गेल्या आठवड्यापर्यंत पाच तालुक्यातून प्रतिसाद मिळाला होता, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याने सरकारकडून या शाळांचा समूह शाळा तयार करताना प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे.
चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तालुक्यांतून समूह शाळांसाठी प्रत्येकी एक प्रस्ताव दाखल झालेला आहे. प्रत्येक समूह शाळेत कमी पटसंख्येच्या १० शाळा असतील. प्रामुख्याने २० पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांचा यात समावेश होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी...
समूह शाळा हा विद्यार्थी हितासाठी महत्त्वाचा उपक्रम असून, या शाळांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण शिक्षण होऊन अभ्यासेत्तर व अभ्यासपूरक अशा दोन्ही उपक्रमात विद्यार्थी पुढे येतील, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी म्हटले आहे.