जळगाव : एकलव्य क्रीडा संकुलनजीक असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मोकळ्या जागेची संरक्षण भिंत गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी जमीनदोस्त झाली होती. आजही ती त्या अवस्थेत पडून असून, त्या जागेचा वापर हा लघुशंकेसाठी केला जात आहे तर दुसऱ्या बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले आहे. परिणामी ही भिंत कधीही कोसळू शकते.
भिंत पाडली की कोसळली?
महामार्गाच्या बाजूने असलेली भिंत ही नवीनचं बांधलेली होती; मात्र तीच भिंत जमीनदोस्त झाली आहे. कुणी तरी पाडली की कोसळली, याबाबत कुणालाही स्पष्ट सांगता आले नाही मात्र शहरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ही संरक्षण भिंत कोसळल्याचे एका चहा टपरी चालकाचे म्हणणे होते.
रिक्रिएशन सेंटरसाठी राखीव
दरम्यान, ही जागा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची असून, ती रिक्रिएशन सेंटर (मुलींचे)साठी राखीव आहे, असे फलक त्याठिकाणी लावले आहे. या भल्या मोठ्या भूखंडात जागोजागी गवत उगवले आहे तर संरक्षण भिंत जमीनदोस्त झाल्यामुळे याठिकाणी काहींनी कचरासुद्धा टाकलेला आहे.
बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर
तंत्रनिकेतनच्या त्या मोकळ्या जागेची संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जळगाव बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच ती संरक्षक भिंत बांधली जाईल. भिंत कुणी पाडली की कोसळली हे सांगता येणार नाही तसेच तंत्रनिकेतनच्या वसतिगृहाजवळील भिंतदेखील तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या बांधकामासाठीही प्रस्ताव दिला असल्याचे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. इंगळे यांनी सांगितले.
नागरिकांनी भिंत तोडल्यानंतर बसविले गेट
एकलव्य क्रीडा संकुलकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडेला त्या खुल्या भूखंडाची संरक्षक भिंत आहे. काही महिन्यांपूर्वी तेथीलदेखील भिंत कुणीतरी तोडल्यामुळे त्या जागेचा लघुशंकेसाठी वापर होत होता. अखेर हा प्रकार कळल्यानंतर त्याठिकाणी गेट बसविण्यात आले आहे; मात्र, संरक्षक भिंत कोसळल्यामुळे लघुशंकेसाठी, कचरा टाकण्यासाठी वापर होत आहे.