जळगाव : शासकीय रेखाकला परीक्षेचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण न देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजप शिक्षक आघाडीकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्री कलावंत असतानासुद्धा महाराष्ट्रात कलेला स्थान नाही. लाखो विद्यार्थ्यांना फुकटचे नव्हे, तर विशेष नैपुण्याचे कायदेशीर गुण हवे आहेत, असे असताना शासनाने २६ मार्च रोजी परिपत्रक काढून चित्रकला ग्रेड परीक्षेचे गुण न देण्याचा आदेश काढला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी सवलतीच्या वाढीव गुणापासून वंचित राहणार आहेत. मुलांच्या भावनांशी खेळ खेळण्याचा शालेय शिक्षणाचा उद्योग चालू आहे. त्यामुळे तत्काळ निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह पदाधिकारी दुष्यंत पाटील, संजय वानखेडे, विजय गिरणारे, आर. एन. निळे, आनंद पाटील, संदीप घुगे, सतीश भावसार, पी. एल. हिरे, किरण पाटील, एन. आर. दानी यांनी मागणी केली आहे.