जळगाव : राज्यातील महाविद्यालय, माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचे ७५ टक्के पगार कापण्याची मागणी सोलापूरच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचा भाजपा शिक्षक आघाडीच्यातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाच्या महामारीत ऑनलाईन शिक्षणासह शिक्षक कोरोना वाॅर्डात जावून रूग्णांची देखभाल करीत आहेत. तेही कुठलेही मेडिकल, पॅरामेडिकलचे शिक्षण नसताना, त्याचबरोबर रेशनवर धान्य वाटप तर कधी घरोघर जाऊन काही ठिकाणी पोलिसांसोबत नाक्यांवर शिक्षकांनी तपासण्या केल्या. कुठल्याही विमा संरक्षणाशिवाय कोरोना महामारीत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण, शाळा बाह्य मुलांचा शोध, बी.एल.ओ. निवडणुका, मग गुरे मोजण्यापासून तर स्वच्छता गृहांची मोजणी करण्यापर्यंतची कामे शिक्षक करीत असतात. नुकतेच धरणगाव तालुका शिक्षकांनी एकत्रित येवून लाखो रुपयांचा निधी जमवून ऑक्सिजनची व्यवस्था केली. तरी देखील काँग्रेसकडून पगार कपातीची मागणी केली जाते. या मागणीचा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रवीण जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.