यावल : आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येथील भुसावळ टी पॉइंटवर महाविकास आघाडीच्या वतीने सुमारे एक तास निदर्शने करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या तीनही बाजूला येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
आमदार शिरीष चौधरी, जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, रा.काॅ.चे विजय प्रेमचंद पाटील, सुखदेव बोदडे, देवकांत पाटील, शिवसेनेचे हुसेन तडवी, सागर देवांग यांनी केंद्र शासनावर जोरदार हल्ला चढवला. आंदोलनात कदीरखान, कामराज घारू हेमंत येवले, अनिल जंजाळे, चंद्रकला इंगळे, नितीन चौधरी, संदीप सोनवणे, गफार शहा, लीलाधर चौधरी, जलील पटेल, राहुल बारी, अमोल भिरूड, कडू पाटील, संतोष खर्चे, गणीखान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पो. नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहका-यांनी बंदोबस्त ठेवला. भारत बंदला शहरात व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवल्याने आवश्यक सेवांव्यतीरीक्त संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद होती.
एस. टी सेवा
येथील आगारातून सकाळी १० वाजेपर्यंतच्या सर्व बसेस सुरू होत्या. मात्र त्यानंतर प्रवाश्याअभावी बसेस बंद झाल्या, असे आगारप्रमुख शांताराम भालेराव यांनी सांगितले.
दरम्यान, बंदमुळे नागरिकांनीही अत्यावश्यक कामाव्यतीरीक्त बाहेरगावी जाण्याचे टाळले.