जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्यम व लहान दुकानदारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॅट संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान व्यापारीवर्ग प्रतिसाद देत नियमांचे पालन करीत आहे. गेल्या वर्षभरापासून व्यापार क्षेत्र संकटात सापडले आहे. त्यात आता गेल्या ३१ दिवसांपासून पुन्हा दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांना करोडो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांना यातून सावरण्यासाठी मदतीची गरज आहे. यामध्ये ज्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांपर्यंत आहे, अशा सर्व मध्यम व लहान व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी केली आहे.