जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने चालणा-या विकास महामंडळाला त्वरित महाराष्ट्र व केंद्र सरकारने निधी द्यावे आणि कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आघाडी सरकार येऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी होत असताना मातंग समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक मदत न देता उलट केंद्र सरकारमधील सामाजिक न्याय विभागातून एनएसएफडीसी केंद्र शासनाच्या संस्थेने राज्य शासनाच्या या महामंडळावर दावा ठोकला आहे. शंभर कोटी कर्ज म्हणून काही वर्षांपूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला दिले होते व ते कर्ज मातंग समाजाच्या नावाने वितरण करण्यात आले. काही घटनांमुळे महामंडळ हे डबघाईला आले आहे. दुसरीकडे व्यवस्थापकीय संचालक यांची खुर्ची ही जप्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एनएसएफडीसी संस्थेने शंभर कोटी कर्ज भरण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाला आदेश द्यावेत, अन्यथा समाजावर मोठा अन्याय होईल, असे निवदेनात म्हटले आहे. निवेदनावर नामदेव मोरे, अनिल पगारे, अरुण खरात, रमेश कांबळे, जगन पगारे, शुद्धोधन भोळे, रोहिदास पगारे यांच्या स्वाक्षरी आहेत.