सागर दुबे जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशिन सर्व्हर डाऊनमुळे बंद आहे. परिणामी, गेल्या पंधरा दिवसापासून धान्याचा पुरवठा होत नसून शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ई-पॉस मिशिनची तातडीने दुरूस्ती करून धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी जोरदार निदर्शने केली.
स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरणासाठी ई-पॉस या बायोमेट्रीक प्रणालीचा वापर केला जातो. धान्य विरतणात पारदर्शकता येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी अनेकदा सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानात उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते. सततच्या या समस्येमुळे शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य घेणा-या लाभार्थ्यांची गर्दी हात असते. परंतू, सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणाचे काम ठप्प पडते. दुकानातील ई-पॉस मशिनमध्ये वारंवार बिघाड होणे, हाताचे ठसे न उमटणे, नेटवर्क न येणे, मशिन बंद पडणे या अडचणींमुळे लाभार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.
त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे ई-पास मशिन बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना ऑफलाईन धान्य वाटप करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना नागरिकांनी जिल्हापुरवठा अधिकारी यांना घेराव घालून समस्या मांडल्या. यावेळी आंदोलनात प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, सागर सपकाळे, संदीप तायडे, किरण अडकमोल, आकाश पान पाटील, संतोष कोळी, सुभाष पाटील, अशोक वानखेडे, रतन भोसले, शबाना खाटीक, नजमा शेख, जरीना पठाण, संतोष कोळी, गुलाल बाविस्कर, कादर शेख, नफिसा अली, जायदा खान, रईसा शेख आदींची उपस्थिती होती.