जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, तर दुसरीकडे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांना विद्यार्थी संख्येनुसार ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर भौतिक सुविधा पुरविण्यात याव्या व वेतनेतर अुनदान त्वरित देण्यात यावे, अशा मागणी संस्थाचालकांकडून करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.आर.एस. डाकलिया यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संस्थाचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष अरविंद लाठी, जयवंत पाटील विलास जोशी, प्रा. जीवन खिवसरा, संजय सोमाणी, महेंद्र मांडे, विक्रम पाटील, मोरेश्वर राणे, शालिग्राम पाटील, मधुकर परशुराम पवार, युवराज महाजन, जगन्नाथ पाटील, शैलेश राणे आदी उपस्थित होते.
अन्यथा शाळा सुरू करण्याबाबत विचार करू
शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ऑक्सिमीटर, थर्मल गन देण्यात यावे, शाळा निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाकडून करण्यात यावे, सन २००४ ते २०१४ पर्यंत शाळांना वेतनेतर अनुदान मिळाले नाही. तसेच सन २०१८-१९ ते २०२०-२१ चेही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्वरित अनुदान देण्यात यावे आदी मागण्या संस्थाचालकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, कुठल्याही सुविधा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाही तसेच शासनाकडून अनुदानही मिळाले नाही. यावर संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त करीत त्वरित अनुदान मिळण्याची मागणी केली. यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार आहे. अनुदान न मिळाल्यास उर्वरित वर्ग सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असाही इशारा संघटनेने दिला आहे.