लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात झाड किंवा झाडांच्या फांद्या तुटून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून महावितरणतर्फे यंदाही मान्सून पूर्व कामे हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या दोन हजार झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर वीज तारा व खांब कोसळले. हे दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असताना, महावितरणतर्फे दुसरीकडे पावसाळी पूर्व वीज वितरणच्या देखभाल व दुरुस्तीचे कामेही युद्ध पातळीवर सुरू आहेत. जळगाव शहरासह जिल्हाभरातील ग्रामीण भागामध्येही वीज प्रवाहाला अडथळा ठरत असलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षण करून अडथळा ठरणाऱ्या २ हजार ४०० झाडांच्या फांद्या तोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी २ हजार २८० झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे लघु आणि उच्च दाबाच्या वीज वाहिन्या सरळ करणे, त्या दुरुस्ती करणे, तसेच यावेळी ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल लेव्हल तपासणे, कमी असेल तर लेव्हल पूर्ण करणे, तसेच खांबावरचे तुटलेले डिस्क आणि पीन इन्सुलेटरही बदलण्यात येत आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात ४०० ठिकाणचे इन्सुलेटर बदलविण्यात आले आहेत. अनेक वेळा विजेच्या प्रवाहामुळे हे इन्सुलेटर तापतात. या इन्सुलेटरवर पाण्याचे थेंब पडल्यास ते तडकून वीज प्रवाह खंडित होतो. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून महावितरणतर्फे तडा गेलेली इन्सुलेटर बदलविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने सुरू व्हावा, यासाठी जळगाव परिमंडळातर्फे प्रत्येक शहर व ग्रामीण भागातील अभियंत्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
इन्फो :
अकराशे डीपींना बसविले सुरक्षा बॉक्स
पावसाळ्यात अनेकदा डीपींमध्ये वीज पुरवठा उतरून विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. विशेषतः उघड्या डीपी राहिल्यावर हे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे महावितरण प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून सुमारे अकराशे डीपींना सुरक्षा बॉक्स बसविण्यात आले आहेत.