जळगाव शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, दररोज हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, व्यापारी संकुले आदी सर्व खासगी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरात मोठी बाजारपेठ असल्याने, जिल्ह्यातील विविध भागांतील लाखो नागरिक दररोज खरेदीसाठी शहरात येत असतात. त्यामुळे खासगी वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बसेसलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. मात्र, शुक्रवारी जनता कर्फ्यूमुळे शहरातील बाजारपेठा बंद असल्याने, महामंडळाच्या प्रवासी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला. प्रवाशांअभावी फेऱ्या कमी करण्यात आल्याने, उत्पन्नावरही परिणाम झाला असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या तीन ते चार लाखांपर्यंत उत्पन्नात घट
गेल्या आठवड्यापासून कोरोना संसर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे याचा महामंडळाच्या सेवेवरही आठवडाभरापासून परिणाम झाला आहे. दैनंदिन उत्पन्न दहा ते अकरा लाखांच्या घरात असताना, सध्या ६ ते ७ लाखांपर्यंत येत आहे. शुक्रवारी जनता कर्फ्यूमुळे उत्पन्नात अधिकच घट झाली असल्याचा अंदाज महामंडळातील अधिकाऱ्यांनी वर्तविला. दिवसभरात एकूण किती उत्पन्नावर परिणाम झाला, याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत समजणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
जनता कर्फ्यूमुळे शहरातील विविध भागांतील बाजारपेठा बंद असल्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला. बाहेरगावी जाणाऱ्यांचीही संख्या कमी असल्यामुळे दिवसभरात ६० ते ७० फेऱ्या कमी केल्या होत्या. यामुळे उत्पन्नावर किती परिणाम झाला, हे रात्री उशिरा समजेल.
- प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार