चाळीसगाव/पारोळा, जि जळगाव : सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूत चाळीसगाव व पारोळा येथे कडकडीत बंद आहे. रुग्णालयातील मेडीकल दुकाने वगळता शहरात पूर्णतः शुकशुकाट आहे.मालेगाव, धुळे, औरंगाबाद या चाळीसगावच्या सीमेलगत असणा-या गावांमध्ये कोरोनाचे रौद्र रुप दिसू लागले असून जनतेमध्ये भितीचे वातावर आहे. कोरोनाबाधितांचा संपर्क होऊ नये यासाठी ३० रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संर्पक कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने १ ते ३ असे तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नागरिकांसह दुकानदार, व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, फेरीवाले यांनीही प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.शहरातील सिग्नल चौक, रेल्वे स्टेशन परिसर, भडगाव रोड, घाट रोड, य.ना.चव्हाण महाविद्यालय परिसर, सराफ व कापड बाजार, वीर सावरकर चौक, नागद रोड कॉर्नर परिसर, चाळीसगाव महाविद्याल चौफुली, बसस्थानक परिसर, कॕप्टन कॉर्नर परिसर, भाजी मंडई आदि भागात पूर्णतः शुकशुकाट आहे. सोशल माध्यमावर विविध संघटनांचे पदाधिकारी सातत्याने नागरिकांना जनता कर्फ्यूत बाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे.कोरोनाला 'हद्दपारच' ठेवण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या शारिरिक संर्पकात न येणे हा चांगला पर्याय आहे. सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. जनता कर्फ्यूत आजच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी दिलेला प्रतिसाद व जपलेले भान कौतुकास्पद असून प्रशासनाने देखील चांगले नियोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केली.
चाळीसगाव, पारोळा येथे जनता कर्फ्यूत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 1:10 PM