लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चोपडा, चाळीसगाव नगरपालिका हद्दीत शनिवारी १३ ते १४ रोजी मध्यरात्री बारापर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. दूध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडिकल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक वगळून सर्व बंद सेवा ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी सायंकाळी काढले आहे. दरम्यान, जळगाव शहरात गुरुवार संध्याकाळपासून तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जळगाव शहरात शुक्रवारी संध्याकाळपासून जनता कर्फ्यू सुरू झाले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस व महापालिका प्रशासनाची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. जळगाव शहराबरोबरच चाळीसगाव व चोपडा या ठिकाणीही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्यासाठी १२ मार्चच्या मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते १४ मार्चच्या मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत.