जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन न होता गर्दी कायम राहत असल्याने जळगाव शहरात ११ ते १५ मार्च दरम्यान जनता कर्फ्यूची घोषित करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी संध्याकाळी दिले. (Public curfew in Jalgaon city from 11 to 15 March due to Coronavirus pandemic)
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दी कमी होताना दिसून येत नाही. त्यातच अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरताना दिसून येत आहेत. यासह अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेदेखील पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरात पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात, गर्दी नियंत्रणासाठी जळगाव शहरात ११ मार्चला रात्री ८ वाजेपासून ते १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.