लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ला जळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तीन दिवसांच्या या कर्फ्यू मुळे जळगावकरांचा केवळ कोरोना पासून बचाव होत नाही तर धुळीपासून देखील बचाव झाल्याचे दिसून आले. प्रत्येक आठवड्यात किंवा महिनाभरात जर जनता कर्फ्यू पुकारला तर शहरातील प्रदूषणासोबत कोरोना वर देखील काही प्रमाणात मात करता येईल असे मत जळगावकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेले दिसून आले.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभर कोरोनाच्या संसर्गामुळे जीवनमानावर परिणाम झालेला दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली, व पुन्हा संपूर्ण जीवनमान नव्या ऊर्जेने व नव्या गतीने सुरु झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा जनतेला गर्दीत टाळण्याचे व सोशल डिस्टंसिंग पाडण्याचे आवाहन केले जात आहे. मार्च २०२० पासून सुरुवात झालेली परिस्थिती मार्च २०२१ मध्ये देखील त्याच परिस्थिती वर येऊन ठेपली आहे.
रस्त्यावरची धूळ झाली कमी
गेल्या काही वर्षांपासून जळगावकरांना धुळीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच गेला महिनाभरापासून ही समस्या वाढल्याने नागरिक थेट रस्त्यावर उतरू लागले आहेत. कोरोनाची कोणतीही तमा न बाळगता नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरत आहे. यामुळे जळगावकरांना कोरोना पेक्षा धुळीची समस्या जास्त त्रासदायक ठरत आहे. मात्र शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू मुळे कोरोना ची साखळी तर तुटणारच आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या जनता कर्फ्यू मुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. यामुळे रस्त्यांवर नेहमी उडणाऱ्या धुळीपासून जळगावकरांच्या बचाव झाला. निदान तीन दिवस तरी धुळीपासून बचाव होईल व सात वेळा घराची साफसफाई करण्यापासून गृहिणींना दिलासा तरी मिळेल.
शहरातील शुकशुकाट ठरला सोशल मीडियावरील ट्रेंड
सकाळपासून शहरातील रस्त्यांवर नेहमी होणारी गर्दी शुक्रवारी दिसून आली नाही. मुख्य बाजारपेठेमधील शुकशुकाट रेल्वे स्टेशन असो वा शहरातील मुख्य चौक सर्व ठिकाणी रस्ते ओस पडल्याने या मुख्य रस्त्यांच्या शुकशुकाचे व्हिडिओ व छायाचित्र दिवसभर सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याचे पाहायला मिळाले.
'' ती '' मालिश नसल्याने नेटकरी नाराज
गेल्यावर्षी जाहीर झालेला लॉक डाऊन दरम्यान गर्दी करणाऱ्या व रस्त्यांवर फिरणार्याना पोलिसांकडून चौकाचौकात चोप दिला जात होता. पोलिसांकडून होणारी ती मालिश सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. त्यामुळे शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान देखील पोलिसांकडून गर्दी करणाऱ्यांना चोप मिळेल अशी शक्यता होती. मात्र पोलिसांनी माणुसकी दाखवत जनता कर्फ्यू मध्ये ती मालिश दिली नाही. मात्र, पोलिसांच्या या निर्णयावर नेटकरी काहीसे नाराज दिसून आले. मात्र शुक्रवारच्या जनता कर्फ्यू सोशल मीडियावर ट्रेंड करून गेला. तसेच अनेक व्हाट्सअप ग्रुप व फेसबुक वरील काही सामाजिक संस्थांच्या पेज वरून पुढील तीन दिवस देखील जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन करण्यात आले.