लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ग्रामीण भागात रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे आणि यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
राऊत यांनी सांगितले की, ‘आता कोविड रुग्णांना जी लक्षणे समोर येत आहेत ती अंगदुखी, डोकेदुखी, चव व वास न येणे, अशी आहेत. ही लक्षणे ताप किंवा ऑक्सिजन पातळीसारखी मोजता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी चौकशी करायला येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही माहिती द्यावी. आता पुन्हा ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही त्रिसूत्री वापरली जात आहे. खासगी डॉक्टरांनीसुद्धा आपल्याकडे आलेल्या या लक्षणांच्या रुग्णांना संदर्भित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात बुधवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर जळगाव शहरात शुक्रवारपासून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनचा सर्व्हे करण्यासोबतच आता प्रशासन पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणीदेखील माहिती घेत आहे. केंद्रीय समितीच्या दौऱ्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.’
प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड गरजेनुसार वाढवले जातील. जिल्ह्यात त्याची पुरेशी उपलब्धतता आहे. मात्र एखाद्या तालुक्यात अचानक रुग्ण वाढल्यास इतर तालुक्यातून तेथे पुरवठा करावा लागतो. तसेच ऑक्सिजन टँक आणि इतर पुरवठ्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि इतरांची नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिसांचे कोविड केअर सेंटर सुरू - पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र नागिरकांनी दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नव्हे तर आजारापासून वाचण्यासाठी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी केले आहे. पोलीस दलाने आता जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी ४० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यात आता चार रुग्ण दाखल आहेत. तेथे त्यांना पौष्टिक जेवण आणि इतर सर्व सुविधा दिल्या जातात, असेही मुंढे यांनी सांगितले.
जळगाव शहरात आजपासून सर्वेक्षण - आयुक्त
जळगाव शहरात १० नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्याद्वारे हॉटस्पॉटचे सर्वेक्षण करण्याचे काम केले जाणार आहे. पिंप्राळा, शिव कॉलनी, खोटेनगर, गणेश कॉलनी, कांचननगर या भागांमध्ये विशेष लक्ष राहील. त्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. तर लक्षणे असलेल्यांनी स्वत: पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.