शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४ ते ५ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यात माधव शिंदे यांच्या पिकाचेही नुकसान झाले. हे प्रकरण गावात मिटण्यासारखे नाही असे दिसताच, माधव शिंदे व इतर शेतकरी तक्रार नोंदविण्यासाठी दैठणा पोलीस स्टेशन, ता. जि. परभणी येथे गेले. सर्व शेतकऱ्यांनी आपापले तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर झेरॉक्स प्रतीवर पोहोच मागितली. याचा राग येऊन ड्युटीवर असलेला पोलीस बळीराम मुंडे याने माधव शिंदे यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की केली व चेहऱ्यावर दोन जोरदार चापटी मारल्या. अनेक लोकांसमोर हा प्रकार घडला व तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घडलेली घटना चित्रित झाली आहे.
२३ जून रोजी घडलेल्या या प्रकाराची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्याच दिवशी केली. अपराधी पोलिसावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केली होती. आठवडा उलटला तरी दोषी पोलिसावर कारवाई न करता गुन्हेगार पोलिसाला पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी लक्ष घालून, पोलिसावर निलंबनाची कारवाई व केलेल्या अपराधाबद्दल गुन्हे दाखल न केल्यास, ५ जुलै रोजी दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व तालुक्यांतील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत असून, राज्यभरातील शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. पृथ्वीराज पाटील यांनी तहसीलदार गावंदे व पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिले आहे. निवेदन देताना सचिन भिला पाटील, शेतकरी बाळू नाना पाटील व भीम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे उपस्थित होते.