भुसावळ : शहरातील मुख्य गर्दी होणाऱ्या ठिकाणांसह रेल्वेस्थानक ते संपूर्ण जामनेर रोडसह शहरातील काही प्रमुख मार्गांवर काही वर्षांपूर्वी असलेल्या मुताऱ्या मागील १० वर्षांत गायब झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी दुकानांची अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांसह गर्दीच्या ठिकाणी मुताऱ्या नसल्यामुळे पुरुष व महिलांची कुचंबणा होत आहे. याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील वाढती लोकसंख्या पाहता शहरातील मुख्य रस्ते, बाजार परिसरात नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पालिकेच्या मुताऱ्या अस्तित्वात होत्या. मात्र, मागील आठ-दहा वर्षांत या ठिकाणच्या बहुतांश मुताऱ्या गायब झालेल्या आढळून येत आहेत.
मुताऱ्यांच्या ठिकाणी सध्या दुकाने, टपऱ्यांसह व्यावसायिक अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या अतिक्रमणांकडे पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याबाबत मागील अनेक वर्षांत कुठलीही कारवाई झालेली नाही; अथवा नवीन मुताऱ्यांची निर्मितीही झालेली नाही.
शहरात तालुक्यासह अन्य तालुक्यांतून अनेक रुग्ण, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिंनी, तसेच चाकरमन्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा या प्रवासी व रुग्णांना परिसरात मुताऱ्या दिसून येत नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. यात महिला व युवतींची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. शहरातील बाजार, तसेच मुख्य रस्त्यांच्या वॉर्डांपैकी बहुतांश वाॅर्डांत महिला नगरसेविका आहेत. त्यांनी किमान महिलांची होणारी कुचंबणा, अडचणी लक्षात घेता याबाबत पालिकेत आवाज उठविण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या ठिकाणी होत्या मुताऱ्या
खडका रोड परिसर, सीआरएमएस कार्यालयाजवळ, जामनेर रोडवर बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील बहुतांश मुताऱ्यांचे दुकानांमध्ये रूपांतर झाले आहेत. मोटू सोबराज चौकाजवळ, अष्टभुजा मंदिरासमोर, नवशक्ती आर्केड, मरीमाता मंदिराजवळ, आठवडेबाजार जैन मंदिराजवळ, अशा बहुतांश ठिकाणी मुताऱ्या होत्या. मागील आठ-दहा वर्षांत आपले गजाभाऊ ओक चौक परिसरात मुताऱ्या होत्या. यात बहुतांश मुताऱ्या पुरुषांसाठी होत्या. शहरात महिलांसाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाव्यतिरिक्त मुतारी आढळून येत नाही.
पर्यायी मुताऱ्या
शहरातील मुताऱ्या गायब झाल्यामुळे नागरिक सध्या रेल्वे म्युझियमजवळ, एचडीएफसी बँकेजवळ (रेल्वे भिंतीलगत), शिवाजी कॉम्प्लेक्सजवळील नाला, अशा बहुतांश ठिकाणी कोनाकोपऱ्यांचा वापर मुतारी म्हणून करताना दिसून येत आहेत. मात्र, महिलांना मुताऱ्यांचा पर्याय नसल्याने कुचंबणा होत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा संघटन सचिव इलियास इकबाल शेख मेमन यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, याबाबत पालिकेकडून अद्याप ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अभियंता रवींद्र बाविस्कर व संदीप देशमुख यांनी शहरातील आपले गजाभाऊ ओक चौकात नसलेल्या मुतारीच्या जागेची पाहणी केली होती. त्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.