विजयकुमार सैतवाल जळगाव : लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे. दररोज संध्याकाळी वाल्मीकनगर या भागात या मुलांच्या मुखातून विविध तालबद्ध स्तोत्र कानी पडत असल्याचे सुखावह चित्र आहे. जळगावातील वाल्मीकनगर या भागात २०१२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने बाल संस्कार केंद्र चालविले जात आहे. यामाध्यमातून संस्कारी पिढी घडविण्याचे काम समितीच्यावतीने अविरतपणे सुरू आहे.
एरव्ही झोपडपट्टी भागातील मुलांकडे फारसे कोणी लक्ष देत नाही व मोल मजुरीमुळे ते शिक्षणापासूनही दूर राहतात. मात्र या मुलांनादेखील आपल्या संस्कृती, देवदेवतांची माहिती, राष्ट्रीय पुरुष व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी समितीच्यावतीने पुढाकार घेऊन संस्कार रुजविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. याठिकाणी रवींद्र अरविंद शुक्ल हे भारतीय संस्कृतीची ओळख या मुलांना करून देत आहे.सुरुवातीला या ठिकाणी चार ते पाच मुले यायची. हळूहळू त्यात वाढ होऊन सहा ते १३ वर्षे वयोगटातील मुलांची ही संख्या २५ ते ३० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यामध्ये १२-१३ मुली तर १५-१६ मुले असतात.
दररोज संध्याकाळी ही सर्व मुले या केंद्रात एकत्र येतात व हात जोडून, एका स्वरात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा यासह विविध स्तोत्र पठण करून घेतले जातात. आता तर या मुलांचे हे स्तोत्र तोंडपाठ झाले असून दररोज संध्याकाळी या परिसरात लहानग्यांच्या मुखातून हे तालबद्ध स्वर ऐकून येणाऱ्या-जाणा-याचे आपसूकच लक्ष वेधले जाते. या सोबतच या ठिकाणी राष्ट्रीय पुरुषांची माहिती देऊन त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करून दिली जाते.
याचाच एक सुखद अनुभव सांगताना समितीतील जिल्हा आरोग्य आयाम प्रमुख नरेंद्र शुक्ल म्हणाले की, निबंध स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयावरील निबंध लिहिण्यासाठी या केंद्रातून मुलांना रात्रीच्या वेळी पुस्तक उपलब्ध करून दिले व सकाळी या निबंध स्पर्धेत याच मुलाने पारितोषिक मिळविले. त्यामुळे या केंद्रातून संस्कार रुजविले जात असल्याची भावना निर्माण होऊन हे केंद्र मुलांना आधार वाटू लागले आहे व इकडे त्यांची ओढ वाढत आहे. मुलांमध्ये देशभक्तीचीही ज्योत जागविण्याचेही काम हे केंद्र करीत आहे.