लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे व विभागीय समन्वयक डॉ.संतोष खिराडे यांनी संपादित केलेल्या ‘कोविड शिक्षण’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कोविड १९ या विषयावर जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, तसेच राज्यातील मान्यवर लेखकांचे पंचवीस लेखांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी रासेयो प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. रासेयोच्या माध्यमातून विद्यापीठाने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे, पोलीसमित्र म्हणून काम करणे, धान्यवाटपासाठी मदत करणे, सॅनिटायझर तयार करून वाटप करणे, औषधांचे वाटप करणे आदी कार्यक्रम राबविले होते. या अनुभवांवर आधारित हा ग्रंथ असून, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी व सारिका माळी यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या प्रकाशनप्रसंगी व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, डॉ.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.संतोष खिराडे उपस्थित होते.